Followers

Tuesday, 4 October 2016

मदर्स डे!!

             दुष्काळ तिच्या पाचवीला पुजलेला, त्यात यंदा हालत भयंकर. सावकाराचं कर्ज, भिशीतली उचल, शे – पाचशेचं हात उसनं तर वेगळंच. 4 पोरांना खाऊ घालायचं एक ना अनेक चिंता त्यात भरीस भर म्हणून पहिल्या बाळंतपणाला आलेली मोठी लेक. विचार कर करुन डोकं अक्षरश: तडकायचं बाकी होतं. गावातल्या रोजगार हमीवर पण काम नव्हतं, मागच्याच कामाचा रोज मिळाला नव्हता. उन्हा तान्हात राबून पायांना पडलेल्या भेगा, ऊस तोडून अंगाचं झालेलं चिपाड यामुळं ती सुद्धा मरायला टेकली होती, पण मरुन चालेल कसं पाच लेकरं आणि लेकीच्या पोटात असलेल्या लेकरामुळं तिला आत्महत्या करायची मुभाच नव्हती, तिच्या नवऱ्यासारखी.
            गावातल्या तानुबायचा निरोप आला, अन तिनं पायातलं चिंबलेलं जोडवं, नाकातली फुली बिली विकून चार – पाचशे रुपये घेतले. पोरांना आठवड्याभराचं डाळ – तांदूळ, मीठ आणलं. मोठ्या लेकीच्या हातावर 50 रुपये ठेवले. पोरांच्या तोंडावरुन हात फिरवून, मुका घेऊन ती निघाली. बारकं पोरगं रडत होत, मागं लागलं होतं.. पण ती टेम्पोत जी बसली ते मागं लागलेल्या पोरगं दिसेनासं होईपर्यंत मागं वळून बघायचा तिचा धापसाच झाला नाही.
तानूबरोबर टेम्पोतनं तालुक्याला येईपर्यंत तिला दिसत होती तिची पोरं, बारक्या पोराचं रडणं.. मुंबईच्या एस.टीत बसल्यावर मात्र तिला दिसू लागलं.. रस्त्यावरचं काम, दीडशे रुपये रोज.. शंभर रुपयाच्यावर रोज हातात न पडलेल्या तिला 50 रुपयांची ‘इन्क्रीमेंट’ म्हणजे खूपच होती. शिवाय आठवड्याने पैसे मिळणार. आठवड्याचे हजाराच्यावर मिळणार. पोरांना पाचशे रुपये पाठवले तर दोन टाईम पोटभर जेवण मिळणार होतं. शे –दोनशेत तिचं भागलं तरी उरलेल्या दोन – तीनशे रुपयांची जमाजम करुन तिला नंतर मोठ्या लेकीची डिलीवरी चांगली करता येणार होती. एखादी साडी, चांदीचा का होईना एखादा डाग, चार दोन खायच्या वस्तू लेकीसाठी.... स्वप्न बघता बघता ती मुंबईत कधी पोचली, तिलाही कळलं नाही.
आज ती लय खुशीत. आज हप्त्याभराचा एक हजार पन्नास रुपये रोज मिळाला होता. लगोलग तानुबायजवळ पाचशे रुपये पाठवायचे, पोरांना खायला पाठवायचं.. जिलेबी, बुंदी.. तिनं मोठ्या लेकीला फोन पण केला. पोरांशी बोलून तिला भरून आलं. थोड्या वेळानी निघायचं म्हणून ती तानुबरोबर तिथंच रस्त्याच्या कडेला मिसरी घासत बसली दोन मिनटं. मिसरीचं शेवटलं बोट दातावर फिरवून दिवसाचा सगळा क्षीण विसरुन ती हसली, मिनीटभर डोळे बंद केले. समोरुन भस्सकन रोलर आला अन दोघींच्या अंगावरुन पुढे गेला.
          पोरं जीव डोळ्यात आणून येणाऱ्या प्रत्येक गाडीची वाट बघत होती. आईनं काय काय पाठवलं असेल याची स्वप्न रंगवत होती. थोरल्या लेकीला गोडाचं डोहाळं लागलं होतं. शेजारची म्हातारी म्हणाली.. बया माह्याराला आलीस.. सगळं व्हईल बग नीट.. तुझी आय तुझं सगळं करंल.. गर्भार बाईच्या डोळ्याला सारखा टिपूस बरं नाय.
कथा टाईपून झाल्यावर मधूने लॅपटॉप बंद केला.. आईने किचनमधून आवाज दिला.. चहा घे गं..लवकर गार होईल.. कप आणायला ती आत गेली. आईला मिठी मारुन म्हणाली.. सो स्वीट ऑफ यू मम्मा.. हॅप्पी मदर्स डे....
Like

तिकीट - एक रमाबाई नगर


             दादरहून 27 नंबरची बस पकडली. संध्याकाळची वेळ असूनही बसमध्ये विशेष गर्दी नव्हती. मी बसलेल्या सीटतच्या पुढच्या सीटवर येऊन एक मुलगी बसली. दादर टीटीला ती बसमध्ये चढली. पर्स, हातातल्या 2 सामानाच्या पिशव्या असं सगळं घेऊन ती कशीबशी चढली आणि बसली. ती बसण्यापुर्वी मी तिच्याकडे पाहिलं, तेव्हा मस्त स्माईलही दिली तिनं. तेवढ्यात कंडक्टर आला माझ्या सीटजवळ आणि त्यानं अतिशय अदबीनं विचारलं... मॅडम, तिकीट? मी म्हंटलं – एक एवरार्ड नगर. त्यानं तत्परतेनं तिकीट दिलं. मला थोडं आश्चर्यच वाटलं. सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना खूप कमी वेळा कर्मचारी तुमच्याशी किमान बरं वागतात. मला तिकीट देऊन तो पुढे गेला. त्या पुढच्या मुलीला त्यानं तिकीट विचारलं. ती म्हणाली रमाबाई नगर. कंडक्टरला आवाज ऐकू गेला नाही, तो वैतागून म्हणाला कुठं जायचंय ? ती पुन्हा एकदा स्पष्ट आणि मोठ्यानं म्हणाली रमाबाई नगर.. त्यानं ऐकलं आणि वैतागून तिकीट फाडलं आणि वैतागत तिच्या हातात देऊ लागला. तिनं ते तिकीट घेतलं नाही, ती शांतपणे म्हणाली पैसे दिलेत, तिकीट नीट द्या. ओ तिकीट घ्या आधी.. बाकीच्या लोकांची पण तिकीटं काढायचीत.. त्याच्या चेहऱ्यावर तेच त्रासिक, कटकटीचे भाव होते. ती मुलगी तिकीट घेईना, ती म्हणाली – हे बघा मी तुम्हाला तिकीटाचे व्यवस्थित सुट्टे पैसे दिलेत. तुम्हाला एकदा ऐकू आलं नाही तर मी न चिडता परत सांगितलं, कुठलं तिकीट हवंय ते, तरी तुम्ही उगाच वैतागताय. जोपर्यंत तुम्ही मला व्यवस्थित तिकीट देत नाही, मी तिकीट घेणारच नाही. आता तो कंडक्टर चांगलाच संतापला. हुज्जत घालायला लागला. ती मुलगी मात्र शांतपणे बोलत होती. ती ठामच होती. तुम्ही मला व्यवस्थित तिकीट द्या, माझा अपमान करु नका, तुसडेपणानं वागू नका.. आणि शेवटतचं वाक्य ती म्हणाली अतिशय निग्रहानं.. तुम्ही शिव्या का देताय? माफी मागून तिकीट द्या नाहीतर मी बस पोलीस स्टेशनला घेते.
         तिचा शांतपणा, योग्य आणि ठाम बोलणं, आत्मविश्वास बघून बसमधल्या सगळ्या प्रवाशांनी निर्विवादपणे तिचीच बाजू घेतली. कंडक्टरला सॉरी बोलून तिला तिकीट द्यावंच लागलं. मला खूप अभिमान वाटला तिचा, तिचं नाव सुजाता, ती एल.एल.बी फायनल इयरला आहे. तिच्याशी आणखी खूप बोलायचं होतं, पण तोपर्यंत माझा स्टॉप आला आणि मला उतरावं लागलं.
         सुजाताला कंडक्टर चिडून, वैतागून का तिकीट देत असेल, असा प्रश्न सूज्ञांना पडणार नाही. पण स्वत:च्या न्याय सन्मानासाठी तिेने जे केलं ते खूप ग्रेट वाटलं मला.